लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा परिषदेतील २०१२-१३ मधील लेखाशीर्ष आणि वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने ७० आक्षेपांवरील तपासणीसाठी दाखल झालेल्या पंचायत राज समितीच्या दिमतीला जि. प. ची यंत्रणा मंगळवारी रात्रीपासून कामाला लागली. बुधवारी दिवसभर दोन सत्रात तपासणीचे काम झाले. या दरम्यान उपस्थित काही मुद्दयांवर समिती सदस्यांनी अधिका-यांना फैलावर घेत मोठी अनियमितता झाल्याचे ताशेरे ओढले. तर शुक्रवारी विभागीय आयुक्तांना हजर राहण्याबाबत फर्मान काढण्याचे संकेत दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात सकाळपर्यंत पीआरसीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह बारा सदस्य डेरेदाखल झाले. सकाळी स्थानिक लोकप्रतिनिधी व जि. प. च्या पदाधिकाºयांसमवेत अनैचारिक चर्चेसाठी वेळ राखीव होता. काही लोकप्रतिनिधी भेटले. परंतू बहुतांश स्थानिक लोकप्रतिनिधी पीआरसीच्या भेटीला आले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर स्काऊट भवन येथील सभागृहात पीआरसीचे सदस्य पोहचल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत झाले. त्यानंतर सर्वांनाच सभागृहातून बाहेर मार्गस्थ होण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सभागृहात राउंड टेबल मांडलेला होता. पीआरसीचे अध्यक्ष, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अकरा तालुक्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील १८ विभाग प्रमुख तसेच मंत्रालयातून आलेल्या सचिव व इतर अधिकाºयांच्या उपस्थितीत साक्ष व कामकाजाला सुरुवात झाली.
दरम्यान, ११ जानेवारी रोजी पं.स. स्तरावरील कामांची पाहणी व योजना राबविलेल्या कामांच्या अनुषंगाने निदर्शनास आलेल्या त्रुटींबाबत गटविकास अधिका-यांची साक्ष तसेच २०१३-१४ वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात साक्ष १२ जानेवारी रोजी होईल.
अध्यक्षांच्या बंगल्यावर भोजनजि. प. अध्यक्षांच्या बंगल्यावर पीआरसी सदस्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तेथे अध्यक्षा सविता गोल्हार, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, समाजकल्याण सभापती संतोष हंगे आदींनी स्वागत केले.मल्टीपर्पज मैदानात गाड्यांचा ताफापीआरसीसमोर साक्ष व इतर कामकाज बसस्थानकासमोरील स्काऊट गाईड भवनमध्ये दिवसभर चालले. त्यामुळे मल्टीपर्पज मैदानातून समिती सदस्य व अधिकाºयांची वाहने फिरली. सुसज्ज झालेल्या मैदानाची दुरावस्था होत असतानाच वाहनांमुळे मैदान आणखी खराब झाले.आक्षेपांवरील चर्चेदरम्यान जि.प. अधिकाºयांकडून समितीला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. सदस्यांच्या अनेक प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाले. २०१२-१३ दरम्यान झालेल्या विविध कामांच्या शासकीय निधीची वारेमाप उधळपट्टी झाल्याची बाब समोर आल्यानंतर आयुक्तांनी या बाबींकडे लक्ष कसे दिले नाही, असाही सवाल सदस्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी दिसून आलेल्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली. तपासणीनंतर पीआरसी सदस्यांचा नाराजीचा सूर दिसून आला.
आक्षेपांशी संबंधित फाईलींवरील कार्यवाहीबाबत खोलवर विचारणा झाल्यास त्या कालावधीत बीड येथे कार्यरत सीईओ, अतिरिक्त सीईओ, विभाग प्रमुखांना बोलावले होते. मात्र, बुधवारी त्यावेळचे काही विभागप्रमुखच आले होते. तर अनेक निवृत्त अधिकाºयांनी त्यांना मिळालेल्या पत्रानुसार हजेरी लावली. विशेष म्हणजे ज्यांची चर्चा होती ते तत्कालीन सीईओ राजीव जावळीकर, लेखा व वित्त अधिकारी जाधवर आले नव्हते. मात्र डॉ. अशोक काल्हे, नईम कुरेशी, तसेच इतर अधिकारी आले होते.