गेवराई (बीड ) : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी, युवक, विद्यार्थी, निराधार, कामगार यांचा आसुड मोर्चा मंगळवारी काढण्यात आला. आंदोलक दुपारी १२ वाजेच्या दरम्यान बाजार तळावरून तहसील कार्यालयावर बैलगाड्यांसह धडकला.
तालुक्यातील श्रावण बाळ,संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे पगार त्वरीत चालु करावेत, सोयाबिन, भुईमुग पिकविमा त्वरीत वाटप करावा, दारिद्र्य रेषेखालील पात्र लाभार्थी, विधवा, अपंग, भुमिहिन यांना तात्काळ घरकुल देण्यात यावी, विधवा भगिनीसाठी स्वनिधी मधील दिवाळी भेट 20 भेट देण्यात यावी, शेतकर्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, जायकवाडीच्या उजव्या कालव्यातुन उप कालवा करावा, भुमिहिन शेतकरी यांना 2 हजार महिना देण्यात यावा, सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अपंगाचा 5 % निधी वाटप न करणा-या ग्रामसेवकाला निलंबित करावे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.
आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष महिला आघाडी लता पंडित, सुनिल ठोसर, सिताराम पंडित, संदिप नामदळे, संजय पवार, संजय नाचन, रामेश्वर भोसले, यशवंत टकले, शिला भोसले, सुरेश नवले, महादेव गोरे, वैशाली साखरे, मंगल आगलावे, सोनाली काकडे यांच्यासह शेतकरी, महिलांचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन तहसिलदार संगिता चव्हाण यांना देण्यात आले.