- पुरूषोत्तम करवामाजलगाव : माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी पुतण्याला पुढे करत राजकीय वारसदार घोषित केले आहे. विधानसभेसाठी पुतण्याची उमेदवारी जाहीर करत एकप्रकारे निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे. आ. सोळंके यांनी जरी उमेदवारी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादीचेच अशोक डकही तयारी करत आहेत. तर भाजपकडूनही मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
प्रकाश सोळंके हे चार वेळा आमदार राहिले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत त्यांनी निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतून ते माघार घेणार असा विश्वास असल्याने पुतणे जयसिंह सोळंके सक्रिय झाले होते. अखेर रविवारी आ. सोळंके यांनी जयसिंह यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे करत विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदार जरी राष्ट्रवादीचे असले तरी भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात आहे. येथे रमेश आडसकर, मोहन जगताप, नितीन नाईकनवरे इच्छुक आहेत.
सोळंकेंना अशोक डक यांचे आव्हानजयसिंह सोळंके यांचे जरी भावी आमदार म्हणून बॅनर लागले असले तरी त्यांना उमेदवारीसाठी त्यांच्याच पक्षातील अशोक डक यांचे आव्हान असणार आहे. डक हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. अजित पवार यांचे विश्वासू असून त्यांनीही उमेदवारी मागितल्याची माहिती आहे.
भाजपचे आडसकर, जगताप शरद पवारांच्या संपर्कातमाजलगाव मतदारसंघात भाजपकडून रमेश आडसकर आणि माेहन जगताप यांचे नाव चर्चेत आहे. परंतु राज्यातील राजकीय घडामोडी पाहता आणि इच्छुकांची गर्दी पाहता या दोघांनीही शरद पवार यांची दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेतल्याची चर्चा आहे.
जगतापांनी केले विरोधात कामभाजपचे मोहन जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारीदेखील पक्षापर्यंत गेल्या आहेत. त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांचाच विरोध असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जाऊ लागले आहे. यामुळे येथील जागा ऐनवेळी भाजपला सुटल्यास नितीन नाईकनवरेदेखील प्रबळ दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात.
पहिल्यांदा पराभव, दुसऱ्यांदा विजयमाजलगाव मतदारसंघात यापूर्वी अनेकजण आमदार म्हणून निवडून गेले असले तरी त्यांना पहिल्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरच दुसऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय झालेला आहे. पहिल्यांदा पराभूत झालेले दुसऱ्यांदा विजयी होतात असा मागील अनेक विधानसभा निवडणुकीतील इतिहास आहे.