बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणायामचे महत्त्व आणखी वाढले आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य स्थितीत ठेवणे, फुफ्फुस निरोगी ठेवणे यात प्राणायाम खूप उपयोगी आहे. मागीलवर्षी कोरानाचा शिरकाव झाल्यानंतर लोकांना आता बऱ्यापैकी योग, प्राणायमचे महत्त्व समजू लागले आहे. जिल्ह्यात आता नियमित व्यायामाबरोबरच प्राणायम करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
शहरात पतंजली योग समिती व काकू - नाना प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक प्रभागात योग दिंडी आपल्या दारी अभियानातून योग वर्गाचे आयोजन करीत जनजागृती केल्याने योगा व प्राणायम करणारे अनेक नवे नागरिक या प्रवाहात जोडले गेले आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे प्रतिबंध असला तरी घरी, टेरेसवर जवळच्या मोकळ्या शुध्द पटांगणात योग प्राणायम करताना नागरिक पहायला मिळतात.
नियमित प्राणायम केल्याचे फायदे
सध्या कोरोनाकाळात प्राणायममुळे श्वसनक्रिया सुधारण्यास मोठी मदत होते. त्याचबरोबर ऑक्सिजनपातळीत सुधारणा होऊन वाढ होते.
ताणतणाव, नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढीस लागते.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही प्राणायम औषधासारखे काम करते. लंग फंक्शन सुरक्षित ठेवते.
प्राणायम केल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी वाढून काही दिवसांत निगेटिव्ह आल्याचा अनेकांना अनुभव आला आहे.
------
तज्ज्ञ म्हणतात, श्वास साक्षात परमात्मा
प्राणायम हीच प्रतिबंधक लस आहे. शरीरशुध्दीसाठी जलनीतीदेखील आवश्यक आहे. त्यामुळे ताणतणाव, थकवा दूर होऊन तंदुरुस्ती जाणवते. शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढण्यास मोठी मदत होते. प्राणायम हाच प्रतिबंधक लस म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच प्राणायम करायला पाहिजे.- नितीन गोपन, योग प्रशिक्षक, बीड.
-------
प्राणायम केल्याने ऑक्सिजन पातळीत वाढ होते, याचा अनुभव येईल. भ्रस्त्रिका तर सर्वात उत्तम आहे. यामुळे दूषित वायू बाहेर फेकले जाऊन अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळते. अनुलोम, विलोम- प्रणवध्यानमुळे मात्रा वाढते. पोटावर झोपून असलेले भुजंगासन, शलभासन, मकरासन, धनुरासनमुळे श्वसन यंत्रणा शंभर टक्के सुधारते. - श्रीराम लाखे, योग प्रशिक्षक
--------
नियमित योगा करणारे म्हणतात...
मी २० वर्षांपासून प्राणायम करतो. आरोग्य संस्था, शाळा, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून योग प्राणायमचे महत्त्व पटवून देतो. कोरोनामुळे बाधित होणारे लंग फंक्शन प्राणायममुळे सुरक्षित राहून ऑक्सिजनचे नियंत्रण करते. श्वास हीच चैतन्यशक्ती आहे. ध्यान, भ्रामरी, ओंकार प्राणायममुळे विविध व्याधींंवर मात करता येते, याचा अनुभव मला आला आहे. - डॉ. राजेंद्र सारडा, बीड.
----------
मी दोन वर्षांपासून नियमित योगा व प्राणायम करतो. सुरुवातीला पुस्तक व नंतर टी. व्ही. पाहून सूक्ष्म व्यायामानंतर योगा व प्राणायम करतो. शरीराला आवश्यक सर्वांगासन, उत्तानपादासन व इतर आसन करतो. त्यामुळे आजार, व्याधी दूर आहेत. ताणतणाव, दगदग न होता रोज ताजेतवाणे वाटते. कोरोनाकाळात योग, प्राणायमचा फायदा होतो. - तुकाराम पवार, शिक्षण विस्तार अधिकारी.
----------