सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली. त्यामुळे घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.बीडमध्ये २००९ मध्ये ६५.६० टक्के, २०१४ मध्ये ६८.७५ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या तुलनेत यावेळी तीन टक्के कमी मतदान झाले. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता बीडमध्ये १ लाख १६ हजार २७१ एवढे अधिकचे मतदान झाले आहे.विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बीडमधील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये १७ लाख ९२ हजार ६५० मतांपैकी १२ लाख ३२ हजार २०२ मतदारांनी (६८.७५ टक्के ) मतदान केले होेते. यावेळी २० लाख ४१ हजार १८१ मतदारांपैकी १३ लाख ४८ हजार ४७३ मतदारांनी (६६.०६ टक्के ) हक्क बजावला. यावेळी जवळपास दोन लाख नवमतदारांची संख्या वाढली होती. २०१४ च्या निवडणुकीत मोदी फॅक्टर असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला होता. यावेळी तसे काही नव्हते. बीड मतदार यादीत काही प्रमाणात घोळ होता. अनेकांची नावेच गहाळ होती. काहींच्या नावात त्रुटी होत्या. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली होती, पारा ४२ वरून ३८ अंशापर्यंत घसरला होता. उन्हाची तीव्रता कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी थोडीफार वाढली.बीडमध्ये भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ.प्रीतम मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, वंचित आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात होते. शेवटच्या टप्प्यात प्रचार जातीपातीवर आला. सोशल मीडियावरून तर अतिशय खालच्या पातळीवर पोस्ट टाकून प्रचार झाला होता. या जातीय प्रचाराचा दोन्हीही उमेदवारांना फटका बसला.मागच्या निवडणुकीत भाजपला झाला फायदा२००९च्या तुलनेत २०१४मध्ये ३.१५ टक्के मतदान वाढले होते. या वाढीव मतदानाचा भाजपला फायदा झाल्याचे दिसून आले होते. यंदाची घट कोणासाठी घातक ठरते ते बघावे लागेल.कुठे मोजणी?सर्व टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. एमआयडीसी परिसरातील बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहा गोदामात ही मतमोजणी होणार आहे.
प्रीतम मुंडे की बजरंग सोनवणे? राजकीय वर्तुळात रंगताहेत गप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:04 AM
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली.
ठळक मुद्दे३ टक्क्यांनी कमी मतदान; पण १ लाख १६ हजार २७१ मतांची वाढ