माजलगाव ( बीड ) : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला असलेले झाडे रातोरात तोडण्यात येत आहेत. अशी बेसुमार वृक्षतोड करणारी एक टोळीच सध्या या भागात कार्यरत आहे. या टोळीने पाञुड ते पारगाव ,लोणगाव ते आनंदगाव या रस्त्यालगतची वृक्ष तोडीचा सपाटाच लावला आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यावरील कमी वर्दळीचा फायदा घेत तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेची अनेक वृक्ष रातोरात तोडण्यात येत आहेत. जवळपास दहा ते बारा जणांच्या टोळीकडून स्वयंचलित मशिनच्या सहाय्याने ही वृक्ष तोड करण्यात येते. रोज शेकडो वृक्षाची कत्तल केली बिनबोभाट सुरु आहे. यातुन ही टोळी मोठ्या प्रमाणावर माया कमवत आहे. तर दुसरीकडे वन विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळे या तस्करांना रान मोकळे सुटले आहे. तसेच गावातील कोणी या प्रकाराला विरोध दर्शवला तर त्याला या टोळीकडून धमकावण्यात येते.
यातच वन विभागाचे माजलगावचे कार्यालय धारुर येथे आहे. तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामस्थ याची तक्रार कुठे करावी याच्या पेचात सापडले आहेत.