बीड : दोन वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन कामकाज पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये नेले जात होते. आत जाण्यापूर्वी गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याने अंडरवेअरमध्ये गांजा लपवल्याचे उघड झाले. त्यानंतर तातडीने कारागृह प्रशासन, महसूल, शिवाजीनगर पोलिसांना बाेलावून घेत पंचनामा केला. हा प्रकार ६ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात नव्या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र ऊर्फ श्याम माेहन शिंदे (रा. बोगा पारधी वस्ती इटकूर ता. कळंब जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात लुटमार करून खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. ६ जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर करून पुन्हा सायंकाळी परत कारागृहात आणण्यात आले. यावेळी गेटवरील मदन शिसोदे व एच. एन. कोल्हे यांनी त्याची अंगझडती घेतली. त्याच्या अंडरवेअरमध्ये एक पुढी असल्याचे समजले. ती काढून त्याची तपासणी केली असता तो गांजा असल्याचे समजले.
या दोन्ही कर्मचाऱ्यांनी तातडीने महसूल, शिवाजीनगर पोलिसांना बोलावून घेत पंचनामा केला. यामध्ये या गांजाचे वजन १० ग्रॅम भरले. याची किंमत १०० रुपये एवढी होती. हा सर्व मुद्देमाल जप्त करून मदन शिसाेदे यांच्या फिर्यादीवरून श्याम शिंदे विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बीएनएस संहिताच्या कलम १७३ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ - २०,८(सी) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.