बीड : राज्यातील डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायती व नवनिर्मित नगर परिषदा, नगरपंचायतींची प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांधील प्रभाग रचना करण्याचे काम नगर रचना विभागाकडून हाती घेण्यात आले आहेत. तर, पाच शहरात प्रभागरचना पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. डिसेंबरअखेर नगरपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालिका व नगरपंचायतांची मुदत संपत आहे. अशा मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे. शासनाने १२ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल.
तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची अलीकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा. परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी सध्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तत्काळ सादर करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, केज व वडवणी येथील प्रभागरचना तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई व धारूर या शहरातील लोकसंख्येनुसार प्रभागरचना तयार करण्यात येणार असून, सर्व अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.
राजकीय पक्ष लागले कामाला
जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का वेगवगळ्या याबद्दल अद्याप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तर, अनेक ठिकाणी राज्यात युती असली तरी, स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळे नेत्यांची डोकेदुखीदेखील वाढली आहे.