- सोमनाथ खताळबीड : बीड मतदारसंघासह शिरूर तालुक्यातील रस्ताकामांवरून राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांत चांगलीच पत्रकबाजी सुरू झाली आहे. हे रस्ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंजूर करून आणले असून, त्याचे उद्घाटन करून आ. संदीप क्षीरसागर हे चमकोगिरी करत असल्याचे पत्रक शिवसेना माजी जिल्हाप्रमुखांनी काढले आहे, तर याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षांनी पत्रकातूनच उत्तर देत विकासपुरुषाने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बडबड करण्यापेक्षा स्वत: काय दिवे लावले ते सांगावे, असा आरोप केला आहे. दरम्यान, बीड मतदारसंघात काका-पुतण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात; परंतू आता यात समर्थकांनीही उडी घेतली आहे. नगरपंचायत निवडणुकीचे मतदान संपताच दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून एकमेकांविराेधात टीका केली आहे.
आमदारांकडून चमकोगिरीचा प्रयत्नआ. संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन करून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता या कामांचे प्रस्ताव ८ जुलै २०१९ रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दाखल व मंजूर करून घेतले होते. ही कामे आपणच मंजूर करून आणल्याचे सांगून नारळ फोडून टाकले. हा केवळ श्रेय घेण्याचा आणि चमकोगिरी करण्याचा प्रयत्न असून, विद्यमान आमदारांनी जनतेची दिशाभूल करू नये व आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, असा टोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, कुंडलिक खांडे यांनी पत्रकातून लगावला आहे.
रोजगार हमीवर काम केलेल्या मंत्र्यांनी बोलू नयेस्वतःला विकासपुरुष म्हणून घेणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी निदान आतातरी आपण सत्तेत नाहीत हे ओळखणे गरजेचे आहे. कारण मागील काही दिवसांपासून आमदार संदीप क्षीरसागर यांनी विकासकामांचा जो धडाका लावला आहे तो बघवत नसल्याने उद्घाटन होत असलेले सर्व विकासकामे मीच खेचून आणले आहेत अशा आविर्भावात रोजगार हमीवर काम केलेल्या माजी मंत्र्यांनी बोलणे योग्य नाही. त्यांनी केवळ पाणंद रस्त्यापुरतेच बोलावे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पूर्वीचे सर्व प्रस्तावित कामे कोरोनाला निधी वळवल्याने रद्द केले होते; परंतु बीड तालुक्यातील सर्व कामे आ. संदीप क्षीरसागर यांनी पुनर्जीवित करून घेतली. याचा तरी अभ्यास करावा, असा सल्ला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव उबाळे व भाऊसाहेब डावकर यांनी पत्रकातून दिला आहे.