लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरु असताना परीक्षार्थींना कॉपी देण्यासाठी आलेल्या तरुणांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हुसकावून लावले. याचा राग आल्याने त्या तरुणांनी प्राचार्यांना रात्रीच्या वेळी रस्त्यात गाठून चाकू आणि फायटरच्या साह्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बीड शहरात बुधवारी रात्री ८ वाजता घडली.पंकज सुरेश कडू (रा. एकनाथनगर, बीड) हे गत दोन वर्षांपासून आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यपदी आहेत. बुधवारी सकाळी परीक्षा सुरु असल्याने ते महाविद्यालयात सर्वत्र देखरेख करत होते. ११ वाजेच्या सुमारास त्यांना प्रज्योत कोटेचा आणि इतर पाच तरुण महाविद्यालयाच्या शिपायासोबत हुज्जत घालून बळजबरीने आत येताना दिसले.कडू यांनी परीक्षा सुरु असल्याने त्या तरुणांना रोखले असता आम्ही येथे कॉप्या देण्यासाठी आलो आहोत, आम्हाला अडविणारे तुम्ही कोण? असे म्हणत प्राचार्यांनाच दमदाटी करत शिवीगाळ केली. त्यामुळे प्राचार्यांनी फोन करून पेठ बीड पोलीस ठाण्यातील दोन होमगार्ड बोलावून घेतले.त्यांनी प्रज्योतला ताब्यात घेताच त्याने गयावया करत प्राचार्यांची माफी मागितली आणि यापुढे महाविद्यालयाच्या परिसरात पाऊल ठेवणार नाही असा लेखी माफीनामा दिला.त्यानंतर रात्री ८ वाजता प्राचार्य कडू यांनी मुलासोबत दुकानात काही खरेदी केली आणि घराकडे निघाले असता वाटेत त्यांना प्रज्योत कोटेचाने आवाज दिल्याने ते थांबले. त्यानंतर प्रज्योत आणि त्याच्यासोबतच्या पाच जणांनी कडू यांच्या मुलाला काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि कडू यांच्या तोंडावर फायटरने वार केला. त्यानंतर प्रज्योतने चाकूने कडू यांच्यावर केलेला वार त्यांच्या कपाळावर लागला.गंभीर जखमी झालेल्या कडू यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाल्यामुळे प्रज्योत आणि त्याचे साथीदार पळून गेले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी प्राचार्य कडू यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कडू यांच्या फिर्यादीवरून प्रज्योत कोटेचा आणि अनोळखी पाच जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कॉपी देण्यापासून रोखले; प्राचार्यावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:17 AM