बीड : मंगळवारी छत्रपत्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमिवर दंगा घालणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमि असणाऱ्या तब्बल अडीचशे लोकांवर बीड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही हा सोहळा पार पाडण्यासाठी नागरिकांनी नियोजन केले आहे. बीड शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने दुपारी २ वाजता मिरवणूक काढली जाणार आहे. यासह जिल्हाभरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यासाठी बीड पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त नियूक्त केला आहे. तसेच गतवर्षी गोंंधळ घालणारे व ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तसेच अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
असा असेल जिल्ह्यातील बंदोबस्तपोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे यांच्यासह ६ पोलीस उपअअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ३३ सहायक पोलीस निरीक्षक, ६० पोलीस उपनिरीक्षक, १८१६ कर्मचारी, ४५० होमगार्ड, राज्य राखीव दलाची तुकडी असा तगडा बंदोबस्त जिल्ह्यात असणार आहेत. तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत. यासह स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, जिल्हा विशेष शाखा हे सुद्धा बंदोबस्तासाठी रस्त्यावर दिसणार आहेत. प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.