अंबेजोगाई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा मोठा फटका सर्वच क्षेत्रांना बसू लागला आहे. धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याने व मंदिरेही बंद राहिल्याने पौरोहित्य करणाऱ्या वर्गासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत योगेश्वरी देवीच्या मंदिरातच पूजा-अर्चा व शहरात पौरोहित्य करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. पौरोहित्य करून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून मंदिर बंद स्थितीतच आहे. जरी काही कालावधीसाठी मंदिर उघडे राहिले, तरी भाविकांचा अभाव राहिला. आता पुन्हा दुसरी लाट निर्माण झाल्यानंतर शासनाने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली. विवाह समारंभ व विविध उपक्रमांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणताही धार्मिक कार्यक्रम पुरोहितांशिवाय पार पडत नाही. विवाह, साखरपुडा, सत्यनारायण, वास्तुशांती, वेगवेगळे अभिषेकसोबतच दशक्रिया विधीही पुरोहितांच्या माध्यमातूनच होतात. मात्र, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व व्यवसाय व सेवा मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमांना खीळ बसल्याने सर्वच पुरोहित आर्थिक संकटात आहेत. ज्या पुरोहितांचा उदरनिर्वाह श्रीयोगेश्वरी देवीच्या मंदिरात चालत होता. ते पुरोहित तर मंदिर बंद राहिल्याने बेरोजगार झाले आहेत. हा कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी पुरोहितांनी देवाला साकडेही घातले आहे.
शासनाने अर्थिक साहाय्य करावे
शासनाने बेरोजगार झालेल्या अनेक घटकांना आर्थिक साहाय्य केले. त्याच धर्तीवर पुरोहितांच्या चरितार्थासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे. वृद्ध पुरोहितांना मासिक मानधन सुरू करावे, अशी मागणी ब्राह्मण संघटनचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे.