वडवणी/कडा (बीड) : ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी खाजगी डॉक्टरांच्या मदतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गरोदर महिलांना उपचार देण्याची व्यवस्था जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. आजवर गरोदर महिलांना तपासणी व उपचार यासाठी बीड येथे जावे लागत होते. मात्र आता प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेच्या अंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्त्री रोग तज्ज्ञाची नियुक्ती करून उपचार दिले जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी सांगितले.
राज्यात दोन वर्षापूर्वीच सुरू झालेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेची आतापर्यंत प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने ग्रामीण भागातील गरोदर महिलांना याचा लाभ मिळत नव्हता, शिवाय उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागत होते. आता या योजनेच्या यशस्वीतेसाठी खाजगी डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. आठवड्यातील ठरवलेल्या दिवशी खाजगी डॉक्टर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन महिलांची तपासणी व उपचार करणार आहेत. तसेच जवळच्याच खाजगी सोनोग्राफी सेंटरवरून तपासणी करण्यात येईल. दोन वेळच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तपासणीची रक्कम जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे.
कडा शासकीय रुग्णालयात गरोदर मातांची सोनोग्राफी करण्याची सोय नसल्याने व असली तरी तज्ज्ञ नसल्याने महिलांना मोठी आर्थिक झळ बसत होती. हीच झळ आता शासन सहन करणार असून, गरोदर मातांच्या सोनोग्राफीचा खर्च आरोग्य विभाग त्यांच्या तिजोरीतून भरणार आहे. प्रधानमंत्री मातृत्व अभियानाचे औचित्य साधून ही मोहीम ९ नोव्हेंबरपासून सुरू हाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोठुळे यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या या योजनेमुळे गरोदर माताच्या उपचारांवर होणारा आर्थिक खर्च टळणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या शिफारस पत्रावरून शासनाने अधिकृत केलेल्या सोनोलॉजिस्ट, डायनालॉजिस्ट यांच्याकडे पाठवून गरोदर मातेची मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील गरोदर महिलांना या अगोदर सोनोग्राफीसाठी ७०० ते ८०० रुपये खर्च होत होता. आता हा खर्च वाचणार आहे. तसेच पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची देखील दखल आरोग्य विभाग घेणार असल्याचे डॉ. कोठुळे म्हणाले.
असा होणार निधीचा वापरगरोदर मातांच्या संख्येनुसार निश्चित केलेल्या दराने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मार्फत पीएफएमएस प्रणालीद्वारे सोनोग्राफी तपासणीचे देयक शासनाने नोंदणीकृत केलेल्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टर यांना अदा करण्यात येणार आहेत. आष्टी तालुक्यातील कडा येथील गांधी, टेकाडे व आष्टी येथील पोकळे हॉस्पिटल एक अशा एकूण तीन खाजगी नोंदणीकृत दवाखान्यात गरोदर मातेची तपासणी करण्यासाठी डॉ. मंजुश्री टेकाडे, डॉ. पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोठुळे म्हणाले.
खाजगी डॉक्टर सरसावले खाजगी डॉक्टर सेवाभावी वृत्तीने सरसावले आहेत. या सुरक्षित मातृत्व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरसावलेल्या डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्रामीण भागासह शहरी भागातील गरोदर महिलांनी लाभ घ्यावा- डॉ.राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड