माजलगाव : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
८-१० महिन्यांपूर्वी केज येथील मुख्याधिकारी पदावर असलेले विशाल भोसले यांच्याकडे माजलगाव नगरपालिकेचा पदभार देण्यात आला होता. दोन-तीन महिने पदभार सांभाळून त्यांची या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भोसले हे अनुभवी व शिस्तबद्ध मुख्याधिकारी आहेत, असे बोलले जात होते; परंतु त्यांनी सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष व नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता काम सुरू केले. ८ महिन्यांपूर्वी नगरपालिकेने पाणी, स्वच्छता, लिकेज काढणे आदी टेंडर काढले होते; परंतु हे टेंडरधारक मुख्याधिकाऱ्यांच्या जवळचे असल्याने ते त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचेच ऐकत नव्हते. कधी टेंडर बंद तर कधी चालू, असे प्रकार सुरू आहेत. या टेंडरचालकांवर मुख्याधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने शहरात जागोजागी लिकेज व घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.
शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केले जाणारे पाणी विनाफिल्टर असल्याने नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. यामुळे नगरसेवकांना प्रभागात फिरणे अवघड झाले आहे. माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नगरसेवकांना पुन्हा मतदारांसमोर जायचे असल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणून त्यांना मेडिकल रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी मंगळवारी एजेंडा काढून शुक्रवारी विशेष सभा बोलावली आहे. या सभेत मुख्याधिकाऱ्यांच्या कामाचे अवलोकन करून पुढील कामकाजाविषयी अवलोकन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मालमत्ताकर मूल्यांकन व पाणीपट्टी व आर्य वैश्य व मराठा भवनाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होणार आहे.
-----
मुख्याधिकारी आमदारांचे विश्वासू
नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे येथील आमदारांचे अतिशय विश्वासू असल्याने ते मनमानी करत असल्याचे नगरसेवकातून बोलले जात होते. यामुळे भोसले यांच्यावर अविश्वास आणून आमदारांनाच आव्हान देण्याचे काम त्यांच्याच मर्जीतील नगराध्यक्ष व नगरसेवक करत असल्याचे दिसत येत आहे.