लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील प्रलंबित प्रकल्पाबाबत आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली. यावेळी मंत्री पाटील यांनी यासाठी जेवढा निधी लागेल तो दिला जाईल, अशी ग्वाही दिली, अशी माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आमदार बाळासाहेब आजबे यांनी सिंचन प्रकल्पाबाबत मुंबई येथे गुरुवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी जुन्या व नवीन होणाऱ्या सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. मतदारसंघाच्या विकास कामासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आष्टी, पाटोदा, शिरुर मतदारसंघांमधील जुने व रखडलेले सिंंचन प्रकल्प व नव्याने मंजुरीसाठी घेतलेले प्रस्तावित सिंचन प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी मंत्री पाटील यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. यामुळे अनेक विकास प्रकल्प मार्गी लागतील, असेही आजबे यांनी सांगितले.
यावेळी मुंबई येथे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील नाथ, यश आजबे उपस्थित होते.