बीड : वैद्यकीय अधिकारी (गट अ वर्ग २) या पदाच्या डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जात आहेत. यासाठी सर्वांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. याची सेवा ज्येष्ठता यादी २४ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्रकाशित करणे अपेक्षित होते. परंतू दुपारपर्यंत एकही यादी प्रकाशित झाली नव्हती. याबाबत संचालक व आकाश एन्टरप्रायजेस या खासगी कंपनीला विचारणा करण्यात आल्यावर रात्रीपर्यंत प्रकाशित करू असे सांगण्यात आले.
परंतू २५ मे रोजी सायंकाळी ६ पर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत आहे. जर आज उशिरा याद्या प्रकाशित झाल्यावर एका दिवसात कसे आक्षेप नोंदविणार? असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारी डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया खोळंबली; दुपारपर्यंत ज्येष्ठता यादीच नाहीशासकीय डॉक्टरांच्या पहिल्यांदाच ऑनलाईन बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात होते. या बदल्यांसाठी नाशिक येथील आकाश एन्टरप्रायजेस ही कंपनी नियूक्त करण्यात आली आहे. पहिल्यांदा प्रशासकीय बदल्यांसाठी १७ मे पर्यंत मुदत होती. नंतर ती १९ आणि २१ मे पर्यंत वाढविण्यात आली. २२ व २३ मे रोजी उपसंचालक कार्यालयाने सर्व अर्ज तपासून लॉक करायचे होते. त्यानंतर २४ मे रोजी सकाळी १० वाजता अंतरीम यादी प्रकाशित करायची होती. २५मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत होती तर २६ मे रोजी आक्षेपांचे निराकरण केले जाणार होते. असे हे वेळा पत्रक सहसंचालक सुभाष बोरकर यांनी काढले होते. परंतू २४ मे रोजी दुपारपर्यंत कसलीही यादी प्रकाशित आलेली नव्हती. ही यादी नसल्याने आक्षेप कसे नोंदविणार? असा सवाल बीडच्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. आता आक्षेपासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही होत आहे.
कोण काय म्हणतात...याबाबत संचालक डॉ.स्वप्नील लाळे यांना विचारणा केली असता याद्या प्रकाशित व्हायला हव्या होत्या. काय अडचण आहे मी विचारतो असे सांगितले. तर आकाश एंटरप्रायजेसचे मनोज भिसे यांना विचारणा केल्यावर ते संतापले. उपसंचालकांचे काम झाले तर आम्ही काय करणार?बुधवारी रात्रीपर्यंत याद्या प्रकाशित करू, असे सांगितले.
वेळ वाढवून द्या २४ मे रोजी सकाळी १० वाजता याद्या प्रकाशित व्हायला हव्या होत्या, परंतू दुपारपर्यंत त्या प्रकाशित झालेल्या नाहीत. आता आक्षेप नोंदविण्यास गडबड होईल. त्यामुळे वेळ वाढवून द्यावा. तसेच या प्रक्रियेत गती ठेवावी.- डॉ.नितीन मोरे, कॅग्मो, बीड