बीड - परळीतील मुंडे बहिण-भावाचा राजकीय वाद आता महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे, जिल्ह्यात कधी कुठं कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्यास ते एकमेकांना चिमटे काढतात. परळीतील कार्यक्रमात खासदार प्रितम मुंडे आणि कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी, भाषण करताना प्रतिम मुंडेंनी परळीतील खराब रस्त्यांवरुन धनंजय मुंडेंना चिमटा काढला. त्यानंतर, धनंजय मुंडेंनीही तशाच प्रकारचे प्रत्युत्तर दिले.
परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. याप्रसंगी प्रीतम मुंडे म्हणाल्या की, परळीत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळेच, मला आज या कार्यक्रमात येण्यास वेळ लागला, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. मी समाजासाठी एवढं दिलं, तेवढं दिलं, समाजासाठी अमुक केलं तमुक केलं हे सांगण्याचा हा कार्यक्रम नाही. आजचा हा कार्यक्रम हा धार्मिक आहे आणि परळीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा आहे, असेही त्यांनी म्हटलं.
प्रितम मुंडेंच्या भाषणानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीच्या विकासाचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. पण, त्यासाठी पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे. म्हणून प्रीतम मुंडेंना येथे पोहोचायला वेळ लागला असावा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. पाया पक्का करायला फार वेळ लागतो, कळस उभा करायला वेळ लागतो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर व स्व. मनोहरपंत बडवे सभाग्रह हे सर्वांसाठी उपयुक्त व्यासपीठ ठरणार आहे. परळीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील भर टाकणारे हे मंदिर निश्चित ठरेल असा विश्वास ना. मुंडे यांनी व्यक्त केला.