फॉलोअप
बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील १४ लाखांचा घोटाळा 'लोकमत'ने पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणला होता. याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश डॉ. साबळे यांनी दिले आहेत. प्रकल्प प्रेरणा विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. सुदाम माेगले यांनी न वापरलेल्या वाहनावर १४ लाख रुपये बिल काढल्याची बाब 'लोकमत'ने १२ सप्टेंबर रोजी चव्हाट्यावर आणली होती. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना भेटी देण्यासह मार्गदर्शन कार्यक्रमे घेतल्याचा दावा करत हे सर्व बिले काढत डॉ. मोगले यांनी काढले होते. याचे पुराव्यानिशी वृत्त प्रकाशित करताच जिल्हा शल्य चिकित्सकांनी डॉ. साबळे यांनी याची गंभीर दखल घेत बुधवारी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. दोन दिवसांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश डॉ. साबळे यांनी दिले आहेत.
--
मैत्री निभावणार की निपक्ष चौकशी होणार?
चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीतील दोन अधिकारी हे डॉ. मोगले यांचे खास मित्र आहेत. आता त्यांच्याकडूनच चौकशी होणार असल्याने चौकशी निपक्ष होते की मित्राला बगल दिली जाते, हे दोन दिवसानंतर समजणार आहे. केवळ काळे कागदे करून अहवाल देण्याचा प्रयत्न केल्यास समितीचीच चौकशी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 'लोकमत'कडून याचा पाठपुरावा केला जाणार आहे.
---
प्रकल्प प्रेरणा विभागातील प्रकार समजला आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. अहवाल मिळाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड