सुख-दुःखात, अडीअडचणीला मदत व्हावी म्हणून शिक्षक कर्मचारी वेतनातून मासिक रक्कम कपात करून भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करतात. मात्र, आपलेच जमा झालेले पैसे त्यांना वेळेवर परत मिळत नाहीत. ते मिळवण्यासाठी अनेक अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. जवळपास १२ ते १८ प्रकारची कागदपत्रे त्यांना जोडावी लागतात. प्रस्ताव सादर केल्यानंतर शिक्षणाधिकारी यास मंजुरी देतात. प्रस्तावास मंजूर झाल्यानंतर त्याचे बिल करून तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत ते कॅफोकडे पाठवले जाते. ते तपासून निधीची तरतूद करण्यासाठी ट्रेझरीकडे पाठवले जाते. या दोन्ही ठिकाणी देवाण-घेवाण केल्याशिवाय हे प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शिक्षकांचे प्रस्ताव अडकल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यपध्दतीद्वारे भविष्य निर्वाह काढण्यासाठी शिक्षकांची वारंवार पिळवणूक केली जात आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासाठी शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.
कोट :
माझा भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव शिक्षणधिकाऱ्यांनी मंजूर केल्यानंतर त्याचे बिल करून जिल्हा परिषदेकडे २५ नोव्हेंबर २०२० रोजी पाठवला आहे. परंतु अद्याप त्याची रक्कम मला मिळाली नाही. यामुळे महत्त्वाचे काम रखडले आहे. यापूर्वीही २०१६ साली चार महिने प्रस्ताव रखडला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होऊ लागली आहे. यामुळे खूप मानसिक त्रास होऊ लागला आहे.
- व्ही. एस. गायसमुद्रे
शिक्षिका, अंबाजोगाई