लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील शासकीय महाविद्यालयातील मुद्रणतंत्र शास्त्र पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी) बीडमधून नाशिकला हलविण्याचा घाट येथील प्राचार्यांकडून घातला जात आहे. असे झाले तर मराठवाड्याला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे प्राचार्यांनी हा प्रस्ताव पाठविण्यापूर्वी महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच विश्वासात घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांचा हा खटाटोप नेमका कशासाठी आहे? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
राज्यात बीड व मुंबई या दोनच ठिकाणी ‘प्रिंटिग टेक्नॉलॉजी’चा अभ्यासक्रम आहे. बीडमध्ये हा अभ्यासक्रम असल्याने मराठवाड्यासह परिसरातील पाच ते सहा जिल्ह्यांतील विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी यशही मिळविले आहे. असे असतानाही येथील प्राचार्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाहीत, येथे त्यांना ‘प्रिंटिग’ प्रात्यक्षिकांसाठी कुठलिही सुविधा नाही, असे कारण सांगून हा अभ्यासक्रम नाशिकला हलविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु असे झाले तर मराठवाड्याला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम न हलविता त्यांना येथेच जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांमधून झाली.प्राध्यापकांनी धरले होते प्राचार्यांना धारेवरप्राचार्यांनी प्रस्ताव पाठविण्यापूर्वी प्राध्यापकांची बैठक बोलावून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु असे न करता केवळ मर्जितील एकाच प्राध्यापकाला बोलावून हा प्रस्ताव तयार केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. प्रस्ताव पाठविल्याची माहिती मिळताच प्राध्यापकांनी प्राचार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. परंतु त्यांच्या या आक्रमकतेचा त्यांच्यासमोर काहीच परिणाम झाला नाही.