बीड : जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-ऑप संस्थेच्या महेश मोतेवारला बीड शहर पोलिसांनी जेरबंद केले होते. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. त्यानंतर त्याला पुन्हा गुजरातच्या राजकोट कारागृहात पाठविण्यात आले.
महेश मोतेवार याच्यावर २२ राज्यांत तब्बल २८ गुन्हे दाखल आहेत. बीडमध्ये ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाच कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. मात्र, तपासात या गुन्ह्याची व्याप्ती वाढली होती. सुमारे अडीच हजार ठेवीदारांना २५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले होते. दरम्यान, या घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवारला १७ नोव्हेंबर रोजी बीड शहर ठाण्याचे उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे, हवालदार आर. जी. तांदळे यांनी गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले होते. सुरुवातीला सात दिवस व नंतर पाच दिवस अशा एकूण १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर ३० नोव्हेंबर रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी न्यायालयाकडून प्रवास वॉरंट घेऊन महेश मोतेवारला पुन्हा राजकोट कारागृहात पाठविण्यासाठी रवाना केले. उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे व सहकारी त्याला घेऊन राजकोटला रवाना झाले आहेत.
ठेवीदारांना न्याय मिळेल का?दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेसारख्या स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याऐवजी शहर पोलीस ठाण्याकडे कायम ठेवल्याने तीन वर्षे तपास रखडला. महत्प्रयासाने महेश मोतेवारला परराज्याच्या कारागृहातून आणले. मात्र, तपासात ना कुठले पुरावे मिळाले ना गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या दृष्टीने काही झाले. शहर पोलीस ठाण्याकडून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णयही झाला नाही. त्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल का, हा प्रश्नच आहे.