अंबाजोगाई - अंबाजोगाईकरांनी शुक्रवारी सकाळी महामोर्चा काढून शालेय विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला. शाळा, महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. शहरातून निघालेल्या या मोर्चामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
शालेय विद्यार्थीनीवर क्रीडा शिक्षक शाम वारकड याने केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. याप्रसंगी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांनी आपल्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या.
यानंतर विद्यार्थीनींच्या हस्ते उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पीडित विद्यार्थीनीस न्याय मिळावा. क्रीडा शिक्षक शाम वारकड या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात यावेत. महिलांना संरक्षण देणारे कायदे कडक करण्यात यावेत अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. मोर्चामुळे शहरातील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. मोर्चात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शहरातील सर्वच शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता.