अंबाजोगाई : जीएसटी आणि आयकर प्रणालीतील जाचक तरतुदींमुळे हैराण झालेले कर सल्लागार आणि व्यापारी यांनी दिनांक 29 जानेवारी 2021 शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांना दिले.
जीएसटी कायद्यात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे वेळच्यावेळी त्याची माहिती होणे व आमलबजावणी करणे यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जीएसटी कायद्याची सरळमार्गाने आणि सुटसुटीतपणे अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी कर सल्लागार आणि व्यापारी संघटनां यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सीए विजय वालवडकर आणि सचिव पुरुषोत्तम रांदड यांनी दिली. साडेतीन वर्षापूर्वी देशात वस्तू व सेवाकर कायदा लागू करण्यात आला. संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण झाले, कराची आकडेवारी वाढली. खोटी बिले, हवाला पद्धत वापरून वर्षानुवर्षे सरकारचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडविणारांवर अंकुश बसला. मात्र, जीएसटी कर प्रणालीच्या तरतुदीत सातत्याने बदल करण्यात येऊ लागले. निरनिराळे परिपत्रक काढणे, वेगवेगळे खुलासे करणे, कायद्याच्या व्याख्यांचा क्लिष्ट अर्थ लावणे, यामुळे व्यापारी आणि कर सल्लागार हवालदिल झाले आहेत. सरकार आणि करदात्यांमधील दुवा असणारे कर सल्लागारांवर देखील मागील तीन वर्षापासून कामाचा प्रचंड ताण आहे. सरकारची धोरणे आणि किचकट भाषेतील कायदे, नियम करदात्यांना समजावून सांगून कर वसुली वाढविण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. परंतु, रोजच्या नवनवीन जाचक तरतुदींची पूर्तता करणे आता कर सल्लागारांच्याही सहनशक्तीच्या बाहेर गेले आहे.
याबाबत वेळोवेळी सरकारकडे मागणी करूनही सरकार अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत नाही. उलट, सातत्याने नवनवीन तरतुदींचा भडीमार करून समस्या अधिकच जटील करण्याचे काम जिएसटी कौन्सिल करत आहे. या सर्व अडचणींकडे केंद्र सरकार व जिएसटी कौन्सिलचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अंबाजोगाई शहरातील व्यापारी, कर सल्लागार व चार्टर्ड अकाउंटंस् दिवसभर काळ्या फिती लावून व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विरोध नोंदवणार आहेत होणार आहेत. शुक्रवारी सर्व कर सल्लागार व चार्टर्ड अकाउंटस् या कायद्याच्या विरोधात काळ्या फिती लावून काम करण्यात आले असल्याची माहिती कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष सीए विजय वालवडकर आणि सचिव पुरुषोत्तम रांदड यांनी दिली. खा. प्रीतम मुंडे यांना दिले निवेदन दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाई कर सल्लागार संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार मा.प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी हा विषय अर्थमंत्री यांच्याकडे हा विषय मांडण्याचे अश्वासन दिले.