- पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड): येथील रहिवासी अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित सिल्वर ओक फिल्म्स व इंटरटेनमेंट प्रस्तुत, मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित “ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्यूजर्सी मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.
“ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची जगभरात दखल घेतली जात आहे. या चित्रपटाची कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील निवड झाली होती. येथे देशविदेशातील नामवंतांनी चित्रपटाचे कौतुक केले. दिग्दर्शक अनुराग बसू, कांतारा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक निरीक्षित देव तर परीक्षक साजीयन कडोनी यांनी चित्रपटाची बांधणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय तंत्रशुद्ध बांधणी आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक केले.
यानंतर आता अमेरिकेतील न्यूजर्सी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “ग्लोबल आडगाव” ची निवड झाली आहे. या महोत्सवात हॉलीवूड, बॉलीवूडसह जगभरातील नामांकित कलावंत, दिग्दर्शक हजेरी लावणार आहेत. मराठीचे संगीत, संस्कृती आणि उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसारित व्हावेत या उद्देशाने हा महोत्सव घेतला जातो. नवीन वर्षात जानेवारी महिन्यादरम्यान चित्रपट बिग सिनेमा, 1655 ओक थ्री रोड एडिसन, न्यु जर्सी 08820, युनायटेड स्टेट येथे दाखवला जाणार आहे.
अनिलकुमार साळवे यांनी यापूर्वी शिरमी व १५ ऑगस्ट या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले होते. त्यांना नाट्यक्षेत्रातीत लेखनाबद्दल अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन रा.रा. दातार पुरस्कार मिळाला आहे. तर १५ ऑगस्ट लघुपटास लंडन येथील न्यूलीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचा बेस्ट डिरेक्टर व बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. १५ ऑगस्ट या लघुपटास भारतातील सर्वांत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके, प्रभातचा व्ही. शांताराम बेस्ट फिल्म डिरेक्टर अवार्ड. केरळ, दिल्ली, राजस्थान, बंगलोर यासह राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय ९१ पुरस्कार मिळाले आहेत. लघुपटाच्या उदंड यशानंतर सिल्वर ओक फिल्म्स अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकतेचा पुरस्कार प्राप्त निर्माते मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित “ग्लोबल आडगाव” हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला आहे. “ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे दोन प्रिव्हू पुणे व मुंबईत झाले, समिक्षकांनी भरभरुन कौतुक केले.
क्रांतीचा संघर्ष - ग्लोबल आडगाव या चित्रपटात शेती मातीत राबणाऱ्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गावजीवनाचं भव्य उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील अस्सल भाषा म्हणी नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग चित्रपटात आहेत. तसेच आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या विनायक पवार, प्रशांत मंडपुवार, अनिलकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षाकांनी उदंड प्रतिसाद दिला. “ग्लोबल आडगाव” म्हणजे शेती मातीतल्या पिढ्यांची जीवघेणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भिंतीना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच ग्लोबल आडगाव आहे.
हे आहेत कलाकार या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कालगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णू भारती, ऋषिकेश आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे, विष्णू चौधरी, रामनाथ कातोरे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहेत.