अंबाजोगाई : सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे बाधित रुग्णांचे रोजच मृत्यू होत आहेत. ही संख्या मोठी आहे. मृत व्यक्ती कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने सदर कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या संकटात आल्याने कुटुंबांचे हाल होत आहेत. उपासमार वाढली आहे. त्यामुळे कोरोनाने मृत पावलेल्या कुटुंबास पाच लाख रुपये अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मराठवाड्यात कोरोनाच्या आजाराने हजारो रुग्णांचे बळी गेले आहेत. यात प्रामुख्याने अनेक कुटुंब प्रमुखांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती बिघडली आहे, तर अनेकांचा औषधांवर मोठा खर्च झाल्याने ती कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. त्यातच त्या कुटुंबांचा आधार गेल्याने अशी अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा कुटुंबांना न्याय देण्यासाठी कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास पाच लाख रुपयांची मदत करावी.
घरगुती वीज ग्राहकांचे कोरोना काळातील बिल माफ करण्यात यावे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दहा हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी, अशा विविध मागण्या बसव ब्रिगेडच्या वतीने करण्यात आल्या आहेत. ही माहिती बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली. या मागण्यांचे निवेदन त्यांनी मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.