दीपक नाईकवाडेकेज ( बीड ) : पीकविमा कंपनीने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ऑफलाईन तक्रार दाखल केली तरच पाहणी करून विमा देण्याची भूमिका घेतली आहे. पीकविमा भरताना सर्व माहिती ऑनलाईन भरलेली असतानाही कंपनीने ऐनवेळी प्रतिनिधीकडे ऑफलाईन तक्रार दाखल करण्याचा जाचक नियम लावल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यामुळे आधीच अस्मानी संकटाने मोडलेला शेतकरी विमा कंपनीच्या करावेलागत असल्याने त्रस्त झाला आहे.
शेतात उभे असलेले पीक काढणीच्या वेळी केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकासह मातीही वाहून गेली आहे. नुकसानीची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑफलाईन माहिती दिल्यानंतर नुकसानीची पाहणी करून विमा देण्याचा पवित्रा विमा कंपनीने घेतल्याने अस्मानी संकट कोसळल्याने कोसळलेल्या शेतकऱ्या समोर सावरण्यापूर्वीच सुलतानी संकट उभे राहिले आहे. शेतातील कामे सोडून शेतातील नुकसानीची माहिती ऑफ लाईन फॉर्म भरून विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे देण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी संतप्त होत विमा कंपनीला विमा द्यायचा नसल्याने अशा प्रकारे शेतकऱ्यावर सुड उगवत असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला हातातील कामधंदा सोडून विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार करण्यासाठी रांगेत उभे राहून तक्रार द्यावी लागत आहे.
विमा कंपनीकडे विमा भरताना सर्व माहिती दिलेली असतानाही पुन्हा माहिती मागून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार विमा कंपनी करत आहेत. - लक्ष्मीकांत लाड, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती