अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव परिसरात असणाऱ्या कोविड कक्षात शनिवारी आ. नमिता मुंदडा यांनी भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाबाधित रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
अंबाजोगाई तालुक्यात व परिसरात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या व रुग्णसेवेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी कोविड केअर सेंटरचे अधीक्षक डॉ. अरुण केंद्रे, वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांची बैठक घेतली. या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक शेख रहीम, सारंग पुजारी, वैजनाथ देशमुख, अॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कोविड केअर सेंटरमध्ये सध्या २५० खाटांची मंजुरी आहे, तर रुग्णालयात २५५ पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. या कोरोना कक्षात डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिका, बंद असलेला ऑक्सिजन प्लांट, औषधांची कमतरता, २४ तास उपलब्ध नसलेले फिजिशियन अशा विविध विषयांवर चर्चा झाली. रुग्णसेवा देत असताना निर्माण होणाऱ्या अडचणी आ. नमिता मुंदडा यांनी समजून घेतल्या व त्या अडचणींचा पाठपुरावा तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केला.
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर अनेक रिक्त पदांना मंजुरी
कोविड कक्षात रुग्णसेवा देत असताना डॉक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या रिक्त जागांमुळे रुग्णसेवेत अनेक अडथळे येत असल्याचा पाठपुरावा आ. नमिता मुंदडा यांनी दूरध्वनीद्वारे तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्याकडे केला.
डॉ. गित्ते यांनी आपण कोविड कक्षासाठी तात्काळ २९ पदे मंजूर केल्याचे आ. मुंदडा यांना सांगितले, तर रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट याबाबत दोन दिवसांत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासणार नाही. ती तात्काळ उपलब्ध करून दिली जातील, असे सांगून
अंबाजोगाईच्या वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात आणखी सुधारित शंभर खाटांची संख्या वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना कक्षात रुग्णसेवा देताना कसल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, असे आश्वासन डॉ. गित्ते यांनी आ. मुंदडा यांना दिले.
===Photopath===
270321\20210327_131238_14.jpg
===Caption===
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव परिसरात असणाऱ्या कोविड कक्षात शनिवारी आ. नमिता मुंदडा यांनी भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाबाधित रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.