बीड : जिल्ह्यातील गेवराई, केज व परळी या तीन उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मनोविकार, मेंदूविकार व व्यसनमुक्ती संदर्भात क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. प्रेरणा प्रकल्पाची टीम आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन, समुपदेशन व उपचार करणार आहे.
ताणतणावामुळे अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. तर काही जण मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. त्यांना आधार देण्यासाठी व यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प काम करीत आहे. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांसह तरुणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात प्रेरणा प्रकल्पाला यश आलेले आहे. आता याच आजारांवर उप जिल्हा रुग्णालयातही क्लिनिक सुरु करुन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
पहिल्या शनिवारी गेवराईमध्ये, तिसऱ्या शनिवारी केजमध्ये, तर चौथ्या शनिवारी परळी उप जिल्हा रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, आर. एम. ओ. डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोहम्मद मुजाहेद, विजया शेळके, अशोक मते, अंबादास जाधव, प्रियंका भोंडवे, शीतल टाक, महेश कदम ही टीम काम पाहणार आहे.