शिरूर कासार तालुक्यातील लोणी येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत, असे गर्दी करून झाले हाेते. यात कोरोना नियमांचे पालन झालेले दिसले नाही.
ना मास्क, ना सोशल डिस्टन्स : सोहळे, समारंभ, कार्यक्रम जोरात, प्रशासनाची जनजागृतीही कागदावरच
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूदर कमी झालेला नाही. आजही लोक विनामास्क फिरताना दिसतात. कोठेही सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन केले जात नाही. प्रशासनाच्या उपाययोजना आणि जनजागृती केवळ कागदावरच आहेत. यावरून कोरोनाबाबत जनता अन् प्रशासन ‘निगेटिव्ह’ असल्याचे दिसते. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६ हजार ७२१ कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. यात १८ हजार २३८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पैकी १७ हजार ४८३ कोरोनामुक्त झाले असून, ५७१ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे रोज सरासरी २० ते ३० नवे बाधित रुग्ण आढळतात. असे असले तरी जिल्ह्यात सर्रासपणे गर्दीचे कार्यक्रम होत आहेत. राजकीय लोकांचे स्वागत, सभा, कार्यक्रमांसह मंदिरांमध्ये गर्दी होत आहे. लग्नसाेहळेही जोरात होत असून, इतर सार्वजिनक ठिकाणी कोरोना नियमांचे कसलेच पालन केले जात नाही. शाळा, महाविद्यालयांमध्ये ठरावीक विद्यार्थीच मास्कचा वापर करतात. असे असतानाही प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसते. सुरुवातीला जी जनजागृती केली जात होती, ती आता काहीच केली जात नाही. त्यामुळे नागरिक गाफील राहत असून, कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही.
पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा परळी तालुक्यातील नाथ्रा येथे स्वागत सोहळा झाला होता. या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते, तसेच शिरूरमध्येही रॅली काढून स्वागत केले होते. येथे नियमांचे कसलेच पालन केल्याचे दिसले नाही, तसेच बीडमध्येही आरोग्य विभागाने घेतलेल्या एका बैठकीच्या कार्यक्रमातही गर्दी होती. अनेक डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मास्क नव्हते.