बीड : परळी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे वाहतुकीचे नियम पालन करण्याबाबत जनजागृती करून वाहनांना रिफ्लेक्टर लावले. यावेळी परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शहाणे, वाहतूक अंमलदार व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वाहनचालक, वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यात आले. महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर, ऑटो, आदींना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.
टाकरवणला तुकाराम महाराज जन्मोत्सव
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे १६ फेब्रुवारी रोजी श्रीराम मंदिर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात भजन, पूजन करून साजरा करण्यात आला. तुकाराम महाराजांच्या अभंगांना उजाळा देण्यात आला. ह.भ.प. लक्ष्मण महाराज गायकवाड, संतोष खोमाड, तुळशीराम लव्हाळे, जीवन कोरडे, आंबुरे, भगवान पाटील, शिवाजी भुबे, पुजारी सुधाकर झेड, आदी उपस्थित होते.
भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ
अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालविली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत चालला आहे. तरीही या भरधाव वाहनधारकांना पोलिसांकडून गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत, कडक पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.