- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड ) : शासनाने अनेक प्रकारचे निधी हे केवळ शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या आधारावरच ठेवले आहेत. यामुळे कोंडीत सापडलेल्या नगर पालिका प्रशासनाने केवळ सोपस्कर पार पाडण्यापुरते सार्वजनिक शौचालयांचे बांधकामे पूर्ण केले. मात्र घाईगडबडीत उभारलेल्या या शौचालयांना अवघ्या दोन महिन्यांच्या आतच अवकळा आली आहे असून वापर सुरु होण्याआधीच ते मोडकळीस आले आहेत.
राज्यातील नगर परिषदांना विविध योजनांसाठी निधी देतांना शौचालयांचे दिलेले उद्दिष्टे पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. दोन वर्षांपासून माजलगांव नगर पालिकेचे शौचालयांचे उददीष्ठ पुर्ण झालेले नसल्यामुळे सर्व प्रकारचा निधी शासनाने अडवुन धरला होता. तसेच नगर पालिकेची सर्व खाती ही गोठविण्यात आली. ही बाब विद्यमान पदाधिका-यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी झपाटयाने हे शौचालयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालयांची निर्मिती सुरु केली. शौचालयांचे बांधकामे होत असतांनाच त्यात मोठया उणिवा लक्षात येत होत्या मात्र निधी थांबविला असल्याचे कारण पुढे करीत थातुर मातुर पध्दतीने काम तसेच सुरु ठेवण्यात आले. त्यातही एका प्रभागात शौचालयाचे बांधकाम चालु असतांनाच एकाच दिवसात स्लॅब कोसळण्याची घटना देखील घडली होती.
माजलगांव शहरात एकुण व्यक्तिगत 2900 शौचालये तर 22 ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आले. व्यक्तिगत शौचालयांचे गुणनियंत्रण प्रक्रिया अजुनही बाकी असली तरी सार्वजनिक शौचालयांनी मात्र माना टाकण्यास सुरुवात केली असुन विविध प्रभागांमध्ये उभारण्यात आलेल्या जवळपास ८० टक्के शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था होणे अजूनही बाकी आहे. तर कांही ठिकाणच्या शौचालयांची वापरा आधीच मोडके दरवाजे, नळांना तोटया नसणे अशी दयनीय अवस्था आहे. शौचालयांची ही परिस्थिती पाहता केवळ टार्गेट पूर्ण करुन नगर पालिकेला निधी मिळविण्यासाठीच घाईगडबडीत काम उरकल्याचा परिणाम दिसून येत आहे. प्रत्येक सार्वजनिक शौचालयावर जवळपास 5 ते 7 लाख रुपयांचा निधी नगर पालिकेकडुन करण्यात आलेला असुन हा सर्व निधी वाया जातो की काय अशी शंका उपस्थित होण्या इतपत गंभिर अवस्था या शौचालयांची झाली आहे.
नागरिकांनी योग्य रितीने वापर करावासार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या शौचालयांचा वापर नागरिक व्यवस्थित करत नाहीत. या ठिकाणच्या साहित्याची तोडफोड करणे, साहित्य चोरी करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नव्यानेच बांधण्यात आलेल्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांनी शौचालयांचा वापर योग्य रितीने करावा. - सुर्यकांत सुर्यवंशी, कार्यालयीन अधिक्षक, नगर परिषद माजलगांव