लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांसोबत जमिनीवरील मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे कोणतेही पंचनामे करीत बसण्यापेक्षा शासनाने शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे रोहित पंडित यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद गेवराई तालुक्यात झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. शेतात उभी असलेली कापूस, सोयाबीन, ऊस, तूर, मूग आदी पिकांसह सीताफळ, डाळिंब, मोसंबी, पपई आदींच्या बागाही भुईसपाट झाल्या आहेत. जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांसोबत जमिनीवरील मातीही वाहून गेली आहे. अनेक गावातील पाझर तलाव फुटले आहेत. त्यामुळेही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांवरील पूल वाहून गेले आहेत. रस्ते उखडले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कसलेही पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणीही पंडित यांनी केली आहे.