अंबाजोगाई : राज्यात कोरोनाचे दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असल्यामुळे नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबाजोगाई नगरपालिकेने तब्बल तीन महिन्यानंतर मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल १०० पेक्षा अधिक नागरिकांना प्रत्येक ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
अंबाजोगाई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव सुुरुवातीपासूनच आहे. जुलै महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण अंबाजोगाईत निघू लागले. त्यावेळेपासून आजपर्यंत रुग्ण संख्येत होणारी वाढ दैनंदिनरीत्या वाढतच चालली आहे. आठवड्यात तीस ते चाळीस रुग्ण नित्याचे ठरले आहेत. अशा स्थितीत अंबाजोगाई शहरात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या बाबतीत कसलेही गांभीर्य नव्हते. ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतर. सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठ व आठवडी बाजार या ठिकाणी गर्दी कायम होऊ लागली आहे. या गर्दीवर प्रशासनाचे बंधन नाहीत. सर्व काही खुलेआम सुरू आहे. कोरोना हद्दपार झाल्याप्रमाणे शहरात हालचाली सुरू आहेत. याला नगर परिषद प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी गांर्भियाने घेतलेच नाही. आता अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना आल्याने तब्बल तीन महिन्यानंतर अंबाजोगाईत पोलीस व नगर परिषद प्रशासनाला खडबडून जाग आली व शनिवारी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. शंभर पेक्षा जास्त व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्या या व्यक्तींकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.