अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथील शेतकऱ्याने मेहनतीने फुलविलेल्या बागेतील वीस टन द्राक्ष निर्यातीला मुभा मिळाल्याने थेट युरोपच्या बाजारपेठेत गेली आहेत. महाराष्ट्रात ४० किलो रूपये भाव मिळत असताना युरोपमध्ये मात्र ८० रूपये किलो भाव मिळाला.
तालुक्यातील पुस येथील रविकांत खानापुरे या शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून गतवर्षी तीन एकरामध्ये द्राक्षाची बाग फुलविली. मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यातच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तीन एकरातील द्राक्षे स्थानिक व्यापाऱ्यांना व नागरिकांना विकावी लागली. या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्याला बसला होता. गतवर्षी केवळ आठ लाख रूपयांचे द्राक्षे शेतामध्ये निघाले. खर्च मात्र पंधरा लाखाचा झाला होता.
यावर्षी फळ विक्रेत्यांना मुभा मिळाल्यामुळे तीन एकरातील द्राक्षे वीस टन युरोपच्या बाजारपेठेत गेली. ४० रूपये किलो महाराष्ट्रात विकणाऱ्या द्राक्षाला युरोपमध्ये ८० रूपये भाव मिळाला. त्यामुळे त्यांना २४ लाखांचे उत्पन्न मिळाले असून गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये झालेला तोटा या वर्षी भरून निघाला.
गतवर्षी कोरोनामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हवाई वाहतुकीसह सर्वच दळण-वळणाची वाहतुक ठप्प झाल्यामुळे विदेशात मागणी असणारे द्राक्षे स्थानिक पातळीवर बेभावात विक्री करावी लागली. यावर्षी फळनिर्यातीला मुभा मिळाली नसती तर फळबाग शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसता. - रविकांत खानापुरे, द्राक्षबाग लागवड शेतकरी,पुस
शेतकरी वळले फळ उत्पादनाकडे
अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश शेतकरी फळबागांकडे वळले आहेत.बाजारपेठेत ज्या फळांना मोठी मागणी आहे.त्याच फळांचे उत्पादन घेण्यावर नवीन शेतकऱ्यांचा भर आहे.शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन वाढते. हे गमक शेतकऱ्यांना सापडल्याने या वर्षी अंबाजोगाई तालुक्यातील द्राक्ष,टरबूज,आंबा ही फळे मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होऊ लागली आहेत.
===Photopath===
240421\avinash mudegaonkar_img-20210424-wa0053_14.jpg