बीड : सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील स्टार्टरची दुरुस्ती का थांबिवली? याचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामसेवकास एका महिलेसह तिघांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी दुपारी गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथे घडली. याप्रकरणी ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
उक्कडपिंप्री येथे सिंदफणा नदीपात्राशेजारी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीवरील स्टार्टर नादुरुस्त झाला होता. तो दुरुस्त करण्यासाठी काहीजण गेले होते. यावेळी रामप्रसाद सखाराम लाखोटे, रामप्रसाद याची आई व सखाराम लाखोटे यांनी स्टार्टर व वायरजोडणीचे काम अडविले.
काम का थांबविले याचा विचारण्यासाठी २२ एप्रिल रोजी ग्रामसेवक बाळासाहेब तांबडे हे गेले. यावेळी तांबडे यांना लाखोटे परिवाराने शिवीगाळ करून, धक्काबुक्की केली. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार हे करीत आहेत.