बीड : वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून, बीड तालुक्यातील साक्षाळप्रिंप्रीत वाळू माफियांची मुजोरी शुक्रवारी पहायला मिळाली. तहसीलदार पथकातील तलाठ्यांनी बहाद्दरपुू ते सोनगाव रस्त्यावर वाळूचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर तीन तलाठ्यांना वाळू तस्करांनी धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार सुशांत शिंदे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच मुरुमाची अवैध वाहतूक करताना हायवावर कारवाई केली. ही कारवाई ताजी असताना पुन्हा शुक्रवारी तहसीलदार यांच्या पथकाने सिंदफणा नदीतील वाळू एका ट्रॅक्टरमध्ये जात असताना बहाद्दरपूर ते सोनगाव या रस्त्यावर पकडली. संबंधित ट्रॅक्टरचालकाने इतर मित्रांसोबत मिळून संबंधित तलाठ्यांना दमदाटी, धमकी देऊन धक्काबुक्की केली. ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेऊन पळून जाऊ नये म्हणून तलाठी कुलकर्णी हे त्या ट्रॅक्टरमध्ये बसले असता त्यांना ट्रॅक्टरमधून ओढून बाहेर काढले. संबंधित ट्रॅक्टरचालकाने वाळू रस्त्यातच टाकून दमदाटी, धमकी देऊन ट्रॅक्टर पळवून नेला. याप्रकरणी संबंधित तलाठी एस.बी.सानप, एस.एस.कुलकर्णी, पी.डी.सानप या तिघांनी वरील घटनेची माहिती तहसीलदार सुशांत शिंदे यांना दिल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गणेश जनार्धन काशीद, रामप्रसाद सखाराम लाखुटे व मधुकर विठोबा काशीद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि पवन राजपूत करत आहेत.