बीड : तालुक्यातील महाजनवाडी येथे केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने २३ जुलै रोजी सायंकाळी छापा टाकून चंदनचोरांच्या मोठी टाेळीचा पर्दाफाश केला होता. चंदनतस्करीचे धागेदोरे थेट मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशात आढळून आले आहेत. पकडलेल्या एका आरोपीला २४ रोजी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित नऊजण अद्याप फरारच आहेत.महाजनवाडी शिवारात अशोक रामहरी घरत याला चंदनाच्या झाडांची खोडे तासून गाभा काढताना रंगेहात पकडले होते. चौकशीनंतर त्याच्या घरात ५९९ किलो चंदनाचा गाभा आढळला. चंदनाची लाकडे, वजनकाटा, वाकस, कुऱ्हाडी व जीप असा एकूण २० लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान,हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून अशोक घरत (रा. महाजनवाडी, ता. बीड), आतीक शेख, शेख आवेज (दोघे रा. नेकनूर, ता. बीड), मारोती वाघमोडे, कल्याण वाघमोडे (दोघे रा. शेवगाव, जि. अहमदनगर), विलास पवार (रा. पात्रूड, ता. भूम, जि. उस्मानाबाद), विष्णू बांगर (रा. साक्षाळपिंप्री, ता. बीड), दत्ता गर्जे (रा. महासांगवी, ता. पाटोदा) यांच्यासह चंदन खरेदी करणारे कुटन (रा. शेंदवा, जि. मंडला, मध्यप्रदेश), शमसो चावला (रा. चावला, जि. मंडला, मध्यप्रदेश) व अमित (रा. हैदराबाद, जि. गोदावरी पूर्व, आंध्रप्रदेश) यांच्यावर नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मध्यप्रदेशातील दोन व आंध्रप्रदेशातील व्यापारी अशोक घरतकडून चंदन खरेदी करीत असल्याचे उघड झाले आहे.
फरार आरोपींचा शोध सुरूआरोपी अशोक घरतला २४ रोजी बीड न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुुरू असल्याचे उपनिरीक्षक अजय पानपाटील यांनी सांगितले.