बीड - धारूर (वार्ताहर) - अंबेवडगाव येथील कोरांटाईन केलेल्या तरुणासोबत गावातील एका तरूणाचे व्हॉटसप वरील मॅसेजच्या कारणावरुन शाळेतच भांडण झाले. हा वाद वाढत असताना सरपंचानी मध्यस्थी करुन हे भांडण सोडवले. मात्र, या दोन्ही कुटूंबाना क्वांराटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे मुंबई वरून गावात आलेल्या लोकांना कोरांटाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी ग्राम पंचायतींना दिलेले आहेत. त्याप्रमाणे धारूर तालुक्यातील अंबेवडगाव ग्रामपंचायतनेदेखील पुणे मुंबई वरून आलेल्या कांही लोकांना जि.प.शाळेत कोरांटाईन करून शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. अशाच एका कोरांटाईन केलेल्या तरुणासोबत रविवारी १७ मे रोजी अंबेवडगाव गावातील एका तरूणाचे मोबाईल व्हाट्सअॅपवरील मॅसेजच्या कारणावरून भांडण झाले. यानंतर गावातील तो तरुण शाळेत कोरांटाईन केलेल्या तरूणाकडे गेला. शाळेत या दोन तरूणात प्रथम शाब्दिक शिवीगाळ होऊन नंतर चांगलीच धराधरी झाली. या दोन तरुणांच्या भांडणात सोशल डिस्टटंन्ससह इतर सर्व नियम धाब्यावर बसवत दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांनी वादात उडी घेतली.
या भांडणात सर्वचजण एकमेकांच्या समोरासमोर तोंडाजवळ तोंड नेत भांडताना दिसत होते. या दोन तरुणांचे शाळेत चालु असलेले भांडण गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. याबाबत येथील सरपंच पौर्णिमा अशोक भोजने यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, झाला प्रकार अयोग्य असून, आम्ही दोन्ही तरुणांसह त्यांच्या कुटुंबाला पोलिसांमार्फत ताकीद दिली. त्यानंतर, दोन्ही कुटुंब होम कोरांटाईन केल्याचे सरपंच भोजने यांनी सांगितले. यापुढे त्यांनी भांडण करुन गावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही कुटुंबातील सर्वांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सरपंच भोजने यांनी म्हटले आहे.