धारूर : येथील बसस्थानक सध्या अनेक समस्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असून, यातच जीर्ण झालेल्या या बसस्थानकाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी धारूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या उज्ज्वला सुधीर शिनगारे यांनी परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समस्यांचे माहेरघर बनले आहे. या बसस्थानकात प्रवाशांसाठी कुठल्याही सोयी उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृह, शौचालय, पिण्याचे पाणी, आदींसह बैठक व्यवस्था डबघाईला आलेली आहे. ऐन बसस्थानकाच्या आवारातही डांबरी अथवा काँक्रीटचे काम नसल्याने अक्षरशः खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यात मुरुम भरल्यानंतर बसस्थानक चर्चेत आले. दरम्यान, येथील नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या उज्ज्वला सुधीर शिनगारे यांनी आ. प्रकाश सोळंके यांच्यासह परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात बसस्थानकाची इमारत ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचा उल्लेख करत येथे सुविधांचा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनात नगर परिषदेने ती नाममात्र दरात परिवहन महामंडळास भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले आहे. बसस्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, या भागात व्यापारी संकुल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर परिषद व राज्य परिवहन विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करून धारूर बसस्थानकाच्या इमारतीचा प्रश्न निकाली काढत नवीन बसस्थानकाची इमारत करावी व शहराच्या वैभवात भर टाकावी, अशी मागणी केली आहे.
धारूर बसस्थानकाचा प्रश्न परिवहन मंत्र्यांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:35 AM