हॉटेलांकडून नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
शैक्षणिक कर्जातून सूट देण्याची मागणी
अंबाजोगाई : कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. तर अनेकांचे व्यवसाय मंदावले आहेत. अशा स्थितीत ज्या पालकांनी शैक्षणिक कर्ज आपल्या पाल्यांसाठी घेतले, त्यांना आता हे कर्जाचे हप्ते भरणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. अशा स्थितीत शासनाने शैक्षणिक कर्ज घेतलेल्या कर्जदारांचे व्याज माफ करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकवर्गामधून केली जात आहे.
बचावासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम
अंबाजोगाई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात व सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो. संभाव्य कोरोनाची लाट ओळखून शहरवासीयांनी दक्षता बाळगावी व मास्क हेच कोरोनावरील प्रमुख औषध समजून प्राधान्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी तसेच सामान्यांमधून केले जात आहे.