बीड : मस्साजोग येथील आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आलेल्या लोकांना विरोध केल्याने सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला. त्याच कंपनीत दोन वेळा चोरी झाली. बीड पोलिसांनी कसलाही विलंब न करता तातडीने पोलिस बंदोबस्त दिला. शिवाय चोरटे शोधून मुद्देमालही हस्तगत केला. परंतू मागील ३ महिन्यात शेकडो गरिबांचे घर फोडले, कष्टाचे पैसे चाेरट्यांनी नेले. त्यांच्या घराला सुरक्षा देणे तर सोडाच, पण चोरीच्या गुन्ह्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. बीड पोलिस काय केवळ धनदांडग्यांसाठीच काम करतात का? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीड पोलिस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आरोपींसोबतच पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले. त्यांच्यावर निलंबण करण्यात आले, परंतू त्यांच्या ठाणे प्रमुखांना पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अभय दिले. त्यातच चोरी, घरफोडीसह इतर गुन्हे काही केल्या थांबायला तयार नाहीत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ३४२ चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील केवळ ११० च उघड झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधीक्षक काँवत यांच्याकडून केवळ सुधारणा झाल्याचा दावा केला जात आहे, प्रत्यक्षात मात्र जैसे थे च परिस्थिती असल्याचे दिसत आहे.
ठाणेदारांना झापायचे अन् एलसीबीला अभय?स्थानिक गुन्हे शाखेत पाच अधिकारी आणि ४० च्या जवळपास कर्मचारी आहेत. त्यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दराेडा असे गुन्हे उघड करणे आवश्यक आहे. परंतू येथील प्रमुख पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्यासह शाखेतील अनेकांवर आ.सुरेश धस यांनी गंभीर आरोप झाले. त्यांचे काम फारसे समाधानकारक नाही. एखादा गुन्हा उघड झाला की एसपींसमोर जावून सांगायचे आणि पाठ थोपटून घ्यायची, असा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. अधीक्षक काँवत यांच्याकडूनही ठाणेदारांची जसे कान टोचले जातात, तसे या शाखा प्रमुखांचे का टोचत नाहीत? हा प्रश्न आहे. या शाखेला काँवत यांचे अभय आहे का? असा प्रश्न आहे.
बसस्थानकात चोऱ्या वाढल्याबीड, केज या बसस्थानकातून महिलांच्या गळ्यातील दागिने, पुरूषांच्या खिशातील पैसे चोरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या रोखण्यातही पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. त्यांचा तपासही लागत नसल्याने पोलिसांबद्दल संताप व्यक्त हाेत आहे.