स्व आर. आर. पाटील सुंदर गाव स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेतून ग्राम निवडीकरिता ११ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय समितीने मूल्यांकनासाठी रोहतवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, कार्यकारी अभियंता हळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, गटविकास अधिकारी मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आव्हाड, कृषी अधिकारी मिसाळ आदी रोहतवाडीमध्ये पडताळणी करण्यासाठी आले होते. या जिल्हा निवड समितीमार्फत गावात झालेल्या एकूणच सर्व विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीचे दायित्व, स्वच्छता, शौचालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, क्रीडांगण, वृक्ष लागवड, स्मशानभूमी, फिल्टर प्लांट, प्रधानमंत्री आवास योजना घरकुल, ग्राम संघाच्या माध्यमातून सर्व बचत गटांचा आढावा, एकूणच सर्वच ग्रामपंचायतअंतर्गत सर्वच बाबींचा आढावा घेऊन सर्व पडताळणी केली होती. यावेळी सरपंच पांडुरंग नागरगोजे व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजनेची माहिती दिली. यावेळी पाटोदा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापुराव राख, विस्तार अधिकारी उत्रेश्र्वर जाधव, बनकर, वीर, सोळुंके आदी उपस्थित होते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार रोहतवाडी ग्रामपंचायत पाटोदा तालुक्यात प्रथम आल्याने १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजनेमध्ये रोहतवाडी तालुक्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:33 AM