अंबाजोगाई : मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून गुरुवारी रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडण्यात आले. सकाळी ९ वाजता मांजरा डावा कालव्यातून गेट क्रमांक १ मधून ३.८७ प्रतिसेकंद घनमीटर या विसर्गाने तर सायंकाळी साडेसहा वाजता मांजरा उजवा कालव्यातून गेट क्रमांक २ मधून ४.१२७ प्रतिसेकंद घनमीटर या विसर्गाने रब्बी हंगामासाठी कार्यकारी अभियंता, मांजरा प्रकल्प १, लघु पाटबंधारे विभाग, लातूर यांच्या परवानगीनुसार पाणी सोडण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली.
आमदार नमिता मुंदडा यांनी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी सातत्याने पाटबंधारे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. चार वर्षानंतर धरण भरले. त्यामुळे चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले.