नियमांची एैशीतैसी
अंबाजोगाई : शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय यामुळे रस्ता अरुंद होत आहे.
रस्त्यावर खड्डे वाढले
धारूर : धारूर ते आसरडोह या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे वाहनधारक वैतागले आहेत. या रस्त्याचे अंतर कापण्यासाठी ३५ ते ४० मिनिटे लागत असून, वाहने खराब होण्याची शक्यता वाढली आहे.
ज्वारी, तुरीला पाणी
शिरूर कासार : सध्या शेतकरी ज्वारी व तुरीला पाणी देण्यात व्यस्त आहे. विहिरींना, बोअरला पाणी भरपूर आहे. मात्र विजेच्या धरसोडीमुळे रात्री-अपरात्री शेतकरी जीव धोक्यात घालून पिकाला पाणी देतोय.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.