बीड : चहा व नाष्टाची उधारी मागितली म्हणून भावकितीलच दोन सख्या भावांनी हॉटेलचालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खूर्च्यांची तोडफोड करत हॉटेल बंद कर, नाहीतर तुम्हाला खल्लाास करीन, अशी धमकी या भावंडांनी दिली. हीघटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता बीड तालुक्यातील म्हाळसजवळ गावात घडली. याप्रकरणी दोघा भावांविरोधात शस्त्र अधिनियमासह इतर कलमान्वये पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजय उर्फ पिंटू विष्णू खांडे व रामेश्वर विष्णू खांडे (दोघेही रा.म्हाळसजवळा ता.बीड) असे आरोपींची नावे आहेत. म्हाळसजवळा गावात विकास खांडे व गणेश खांडे या दोघांचे चहा, नाष्टाचे हॉटेल आहे. २३ जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता विजय व रामेश्वर हे दोघे भाऊ हॉटेलवर आले. तुम्ही लई माजलात का, मला उधारीचे पैसे कशाला मागतात, असे म्हणत आगोदर खूर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर घरी जावून विजय याने तलवार आणली. हॉटेल बंद कर, नाहीत तुम्हाला तलवारीने खल्लास करीन, अशी धमकी देत दहशत निर्माण केली.
यापूर्वी देखील या भावंडांनी विकास खांडे यांना हॉटेलवर येऊन अनेकदा शिवीगाळ केली होती. परंतू त्यावेळी तक्रार केली नाही. तरीही या भावंडांमध्ये सुधारणा झाली नाही. अखेर २३ जानेवारी रोजी त्यांनी हॉटेलचे नुकसान करण्यासह तलवार घेऊन दहशत निर्माण केली. यावरून विकास यांच्या फिर्यादीवरून विजय खांडे आणि रामेश्वर खांडे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.