- नितीन कांबळे कडा (बीड): अनेक महिने उलटून गेले तरी नगर ते आष्टी या यामार्गावर रेल्वे धावली नाही. रिकामे पडलेल्या कडा रेल्वेस्थानकाची माथेफिरूंनी तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाला जाग आली असून आज स्थानकाच्या मुख्यगेटला कुलूप लावले आहे, पण याबाबत तक्रार देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग बीडकरांचे स्वप्न आहे. नगर ते आष्टी या दरम्यान रेल्वेमार्ग पूर्ण झाला आहे. रेल्वे चाचणी देखील घेण्यात आली. रेल्वे दैनदिन धावणार असल्याची घोषणा देखील रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात केली होती. पण अनेक महिने उलटून गेले तरीही अद्याप देखील रेल्वे धावली नाही. या मार्गावरील रेल्वेस्थानक सुसज्ज करून ठेवण्यात आली होती. पण रेल्वेच न धावल्याने स्थानके रिकामी पडली आहेत.
दरम्यान, सुरक्षा रक्षक नसल्याने कडा येथील रेल्वेस्थानकात घुसून काही माथेफिरूंनी आतील काचा, दरवाजे तोडून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केल्याचे उघडकीस आले. याबाबत 'लोकमत' ने सविस्तर वृत्त दिले होते. यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. आज त्यांनी स्थानकाच्या मुख्यगेटला कुलूप बसविले आहे. पण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या विरोधात अधिकाऱ्यांकडून कसलीच तक्रार देण्यात आली नाही. तक्रार न दिल्याने असे प्रकार पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्तॅ नितीन गायकवाड यांनी केली आहे.