संजय खाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : कोरोना काळात लावण्यात आलेले लॉकडाऊन संपल्यामुळे हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. परंतु परळी रेल्वे स्थानकामार्गे धावणाऱ्या दहा पॅसेंजर व दहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या अजूनही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून खिशालाही झळ बसत आहे.
महामंडळाच्या बससेवा चालू झाल्या आहेत. परंतु बंद केलेल्या पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. स्वस्त प्रवासी सेवा असलेल्या रेल्वे सेवेऐवजी महाग असलेल्या बस, ट्रॅव्हल्स पर्यायांचा प्रवाशांना नाईलाजाने वापर करावा लागत आहे. त्यामुळे गंगाखेड, परभणी, उदगीर, औरंगाबाद, हैदराबाद येथे कायम प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला जास्त झळ बसत आहे. पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर चालू झाल्या, तर प्रवासी व छोटे-मोठे व्यापारी यांचा वेळ व पैसाही वाचेल. एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू नसल्याने मुंबई, पुणे, नागपूर येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
....
परळीतून धावतात सहाच रेल्वे, प्रवासी संख्या वाढतेय
परळी रेल्वे स्थानकातून सध्या नांदेड - बंगळुरू, बंगळुरू - नांदेड, औरंगाबाद - हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद, काकीनाडा-शिर्डी, शिर्डी - काकीनाडा या सहा रेल्वे धावत आहेत. या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे.
....
हैदराबाद, औरंगाबादला आरक्षण
परळी रेल्वे स्थानकातून औरंगाबाद - हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एक दिवस अगोदर आरक्षण करावे लागते, तर बाकी रेल्वे गाड्यांना सहज सीट उपलब्ध होत आहे.
...
वर्षभरापासून पॅसेंजर रेल्वे बंदच
परळी रेल्वे स्थानक मार्गे धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या २२ मार्च २०२० पासून बंदच आहेत. परळी-अकोला, अकोला-परळी, परळी-पूर्णा, पूर्णा-परळी, आदिलाबाद-परळी, परळी- आदिलाबाद, निजामाबाद-पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद, मिरज-परळी, परळी-मिरज या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. या पॅसेंजर रेल्वे गाड्या कधी सुरू होणार,असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर बंद रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
.....
..या एक्स्प्रेस रेल्वेही बंदच
पनवेल-नांदेड, नांदेड-पनवेल, अमरावती-पुणे, पुणे-अमरावती, कोल्हापूर-नागपूर, नागपूर-कोल्हापूर, सिकंदराबाद-शिर्डी, शिर्डी-सिकंदराबाद, विजयवाडा-शिर्डी, शिर्डी-विजयवाडा या एक्स्प्रेस रेल्वे बंद आहेत. त्याही सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. बंद रेल्वे गाड्या कधी सुरू करणार, यासंदर्भात अद्याप रेल्वे प्रशासनाकडून माहिती आली नसल्याचे येथील रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
...