शिरूर कासार : तालुक्यात बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने रायमोह शिवार झोडपून काढले. सोबत, गाराही पडल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली, तर आंब्याचा मोहर व कोवळ्या कैऱ्या झडून गेल्याची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी भरत जाधव यांनी दिली. तालुक्यात गेल्या तीनचार दिवसांपासून पावसाळी वातावरण असून ढगांचा गडगडाट सुरू होता. मात्र, बुधवारी गारांसह अवकाळी पाऊस बरसला. पावसासोबत वाराही असल्याने गहू, उन्हाळी बाजरीसह अन्य पिकांना झळ बसली. रस्त्यावर पाणी वाहत असल्याने उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव ग्रामस्थांना मिळाला. पाडळी शिवारातदेखील पाऊस झाला. मात्र, गारा आणि वारा नसल्याचे विजय सरवदे यांनी सांगितले.
शिरूर कासार तालुक्यात रायमोहापाठोपाठ खोल्याचीवाडी, पिंपळ्याचीवाडी परिसरात वादळी वारा आणि गारांचा मारा बसल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. त्यात मिरची पीकही पाण्यात गेल्याचे दिसून आले.
===Photopath===
140421\img-20210414-wa0103_14.jpg~140421\vijaykumar gadekar_img-20210414-wa0087_14.jpg