बीडःमराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडत असून, पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. मागील काही दिवसांत मराठवाड्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी बीडमध्ये नुकसानीची पाहाणी केली.
बीड जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापसाचे पिक वाहून गेले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी यावेळी संभाजीराजे थेट बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासोबतच मंत्र्यांवरही टीका केली.
मंत्र्यांचे माहित नाही...
राज्य सरकारमधील मंत्र्यांनी नुकसानीची पाहाणी करण्यासाठी यावं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मी राजवाडा सोडून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर आलोय, अशा भावना संभाजीराजेंनी व्यक्त केल्या. तसेच, एनडीआरएफ आणि एसआरएफच्या विशेष बाबीमधून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा, अशी यावेळी सरकारकडे त्यांनी मागणी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजीराजे म्हणाले की, 'परतीच्या पाऊसामूळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांतमध्ये 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात महिला शेतकरी व युवा शेतकऱ्यांचाही समावेश आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे पंचनाम्या मध्ये वेळ न घालता दिवाळीच्या अगोदर विशेष बाब म्हणून सरसकट 100% पीकविमा मंजुर करण्यात येण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आदेश काढावा, याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, असेही ते म्हणाले.