बीड : यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या असून, जोरदार पावसानंतरच चित्र बदलू शकेल, अशी स्थिती आहे.
जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १२९.२० मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी गेवराई तालुक्यात ८४.४ मिमी तर सर्वात जास्त २४४.४ मिमी पाऊस अंबाजोगाई तालुक्यात बरसला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी बºयापैकी पाऊस झाला. दुसºया आठवड्यात पेरणीयोग्य पावसामुळे शेतक-यांनी पेरण्या सुरु करण्यास लगबग सुरु केली. मात्र, १२ ते २० जूनदरम्यान पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांची गती मंदावली. २१ जूननंतर एक-दोन चांगल्या पावसामुळे पेरण्यांनी वेग घेतला. परंतु मागील ९ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत केवळ ३५ टक्केच पेरणी होऊ शकली. पेरणी केलेल्या शेतकºयांना आता पाऊस नसल्याने चिंता लागली आहे. कोवळी पिके करपण्याची भीती असून, पुरेशा ओलीअभावी पेरणी करु न शकलेल्या शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या मात्र आभाळ येतं अन् वारं सुटतं अशी स्थिती आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. आतापर्यंत १ लाख ११ हजार ४९८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात सर्र्वाधिक पेरा गेवराई तालुक्यात झाला आहे.सोयाबीनची ५४ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून केज तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.१२ हजार १४२ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली असून परळी तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.४ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रात मुगाची व ३६८० हेक्टरात पेरणी झाली असून दोन्ही पिकांचा सर्वात जास्त पेरा आष्टी तालुक्यात झाला आहे.
सोयाबीन बियाणांचा बाजारात तुटवडामागील वर्षी कृषी व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे विक्रीसाठी आणले होते. परंतु, बहुतांश शेतक-यांनी घरचे सोयाबीन पेरले. त्यामुळे व्यापा-यांकडे शिल्लक माल राहिला. शेतकरी घरचे बियाणे पेरतात म्हणून यंदा व्यापा-यांनी सोयाबीन बियाणे प्रमाणात आणले. परंतु यंदा क्षेत्र तसेच बाजारात मागणी वाढल्याने सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला. प्रमाणित किंमतीपेक्षा कमी दरात मिळणारी ३० किलो बियाणांची बॅग प्रमाणित किंमतीत, तर काही व्यापाºयांनी संधीचा फायदा उचलत जादा रक्कम उकळली.
सोयाबीनला जास्त पावसाची आवश्यकता असते. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. तर ज्यांनी अद्याप पेरण्या केल्या नाही अशा शेतकºयांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.